सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पार्क चौक येथे घडली. याप्रकरणी सत्यजित गणेशदास परदेशी (वय-३४,रा.लक्ष्मीनारायण अपार्टमेंट,दक्षिण सदर बझार) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अग्निवेश नकाते (वय-३०,रा. बाळे) व त्याचे दोन अज्ञात साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की ,फिर्यादी हे जिल्हा स्तरीय स्पर्धा असल्याने कोचिंग करण्यासाठी आले होते.त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र कपिल कोळी असे चहा पिण्याकरिता जात असताना समोरून दोन अज्ञात इसम आले व फिर्यादीस तू माझे मित्र नकाते बद्दल मागे का बोलतो असे म्हणाले.
त्यावेळी फिर्यादी तुम्ही कोण आहात, मी ओळखत नाही. त्यांना समोर घेऊन या असे म्हणाले असता,फिर्यादीस शिवीगाळ करून तुला लय मस्ती आली आहे. असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर अग्निवेश नकाते हा त्याची दुचाकी वरून येऊन त्यानेही फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यातील एकाने दगड उचलून फिर्यादीच्या पाठीवर हातावर मारून जखमी केले व अग्निवेश नकाते याने गाडीच्या चावीने फिर्यादीच्या तोंडावर छातीवर मारून जखमी करत तुला खल्लास करतो अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुलाणी हे करीत आहेत.