सोलापूर

सोलापूरची कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात गुरुवारी घटस्थापना

सोलापूर, दि. २९- सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दि. ३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.रूपाभवानी मंदिरात गुरुवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. दररोज नित्तोपचार पूजा व छबिना असे धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाली आहे. गुरुवार दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी १२.१५ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना निघणार आहे. ७ रोजी ललिता पंचमी असून सायंकाळी ५ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे. 
 दि. ११ रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून  रात्री ७ वाजता  मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे. रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे. दि. १२ रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी ५ वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. पालखीतून श्री रुपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. 
 या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल. 
दि. १६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची महापूजा व  दूधप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दि. १७ रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. 
  या पत्रकार परिषदेस सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले, सुधीर थोबडे राजशेखर हिरेहब्बु, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मल्लिनाथ खुणे, बिपीन धुम्मा, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगेची व्यवस्था
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप असलेल्या श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात हजारो महिला भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुषांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरही ठेवण्यात आले आहे. दर्शनासाठी येताना महिलांनी आपली दाग-दागिने सांभाळावेत, लहान मुलांना गर्दीत सोडू नये, असे आवाहन ट्रस्टी मल्लिनाथ मसरे यांनी केले आहे. 

Related Articles

Back to top button