ब्रेकिंग! सोलापूर विमानतळ उद्घाटनाला नवा मुहूर्त

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसला. काल पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने मोदी यांच्या हस्ते काल पुणे मेट्रोच्या भुयारी प्रकल्पाचे उद्घाटन व एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता मेट्रोचे उद्घाटन कधी होणार, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला होता.
दरम्यान, आता मेट्रोच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर झाली असून मोदी यांच्याच हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. रविवारी (दि २९) मोदी हे व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यानंतर भुयारी मार्ग लोकांच्या सेवेसाठी सुरू केला जाणार आहे.
पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे काल होणारे मेट्रोचे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नवी तारीख कधी जाहीर होणार याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचे उद्घाटन रविवारी मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदी पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सोलापूर विमानतळाचे उद्घाटनदेखील मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.