क्राईम
ब्रेकिंग! वनराज आंदेकर खून प्रकरणात भलताच ट्विस्ट

पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात आता मध्य प्रदेश कनेक्शन समोर आले आहे. आंदेकर यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचेन्यायाधीश व्ही.आर. कचरे यांना एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खोंड याच्या अटकेनंतर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 21 झाली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
टोळीवादातून वनराज यांची हत्या करण्यात आली असून आरोपी खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना त्यासाठी वापरलेले पिस्तूल मध्य प्रदेशातून आणण्यास मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हत्येनंतर खोंड पसार झाला होता. या काळात त्याला कोणी आश्रय व आर्थिक मदत दिली, त्याने आणखी पिस्तुले आणली का, ती कोणाला विकली, या सगळ्या बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.