खुशखबर ! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
पेट्रोल डिझेलच्या दरात लवकरच कपात होण्याची शक्यता असून सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांचा वाहन इंधनावरील नफा सुधारला आहे. यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी कपात करण्याची संधी मिळाली आहे. रेटिंग एजन्सी इक्राने आज ही माहिती दिली.
सीएलएसएच्या म्हणण्यानुसार, पाच ऑक्टोबरनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. भारताचे पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गेल्या महिन्यात किंमती घसरण्याची सूचना केली होती. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी (ओएमसी) वाहन इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील विपणन मार्जिन अलीकडच्या आठवड्यात सुधारले आहे.
कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या दरात कपात होण्यास वाव आहे, असा अंदाज रेटिंग एजन्सीचा आहे.