सोलापूर
ब्रेकिंग! गुरुवारी सोलापूर बंदची हाक

सोलापूर – सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ 26 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या आठ वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांचे आंदोलन सुरू आहे. 50 टक्केच्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासनाकडून विशेषता: सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडविण्याचे कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू व्हाव्यात याकरिता शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस राजन जाधव, विनोद भोसले , महादेव गवळी, विलास लोकरे, ज्ञानेश्वर सपाटे, प्रकाश ननवरे, शिवाजी चापले आदी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवा सोडून शाळा व आस्थापना बंद राहणारया सोलापूर शहर – जिल्हा बंदच्या दरम्यान सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तर शाळा- महाविद्यालय तसेच सर्व प्रकारच्या आस्थापना ,दुकाने बंद करण्यात यावे, असे आवाहन माऊली पवार यांनी केले आहे.



