अंगावर काटा अन् डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स

‘छावा’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट अखेर आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. आता थिएटरमध्ये ‘छावा’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विकी कौशलच्या करिअरमधील सर्वांत जबरदस्त परफॉर्मन्स.. अशा शब्दांत प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांत ‘छावा’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा कमालीची झाली होती. त्यामुळे हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम रचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘छावा’ला पाचपैकी साडेचार स्टार्स रेटिंग दिली आहे. इतिहास, भावना, देशभक्ती या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स, अशा शब्दांत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.



