क्राईम
स्वतःला डॉन म्हणत हातात तलवार घेऊन मंडळाच्या स्टेजवर धिंगाणा
स्वतःला डॉन म्हणत हातात तळपती तलवार घेऊन एका सराईत गुंडाने कोल्हापूर येथील विक्रमनगर परिसरात एका मंडळाच्या स्टेजवर काल रात्री दहशत माजवली. यावेळी त्याने अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला पोलिसी खाक्या दाखवत जेरबंद केले.
सचिन शिवाजी आगलावे (वय २६, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
विक्रमनगरात स्वामी समर्थ मंदिराजवळ एका मंडळाने गणेशोत्सवासाठी स्टेज घातले होते.
काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सराईत गुंड सचिन हातात तळपती तलवार घेऊन तेथे आला. विशाल नावाच्या कार्यकर्त्याला मोठ्याने हाका मारून शिव्या देऊ लागला.
अश्लील शिवीगाळ करत तलवार घेऊन तो स्टेजवर चढला. कार्यक्रम का बंद केला, मी तुम्हाला कधी त्रास दिला आहे का? असे मोठ्याने ओरडू लागला. दरम्यान या गुंडाची दहशत पाहून तेथील नागरिक भयभीत झाले.
नागरिकांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक त्याठिकाणी गेले. त्यांनी संशयित सचिन याला अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे.