क्राईम
चेष्टा मस्करीत हॉटेलमध्ये गोळीबार
राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या माजी नगरसेवकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढे असे त्यांचे नाव असून त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून चुलत भावाने भिंतीवर गोळी झाडली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद नढे यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि सचिन नढे यांच्यावर जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका लावण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नढे कुटुंबातील काका-पुतणे एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बसले होते. त्यावेळी एका काकांनी विनोद यांना फोन करून बोलावून घेतले. गणपती आरती करण्यासाठी मंडळाच्या भेटी घेत असतानाच विनोद काकांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी तू काळजी घेत जा, पुण्यात माजी नगरसेवकाची नुकतीच हत्या झाली. याची आठवण विनोद यांना करून देण्यात आली.
तेव्हा विनोद यांनी कंबरेला हात लावत मी आता बंदूक घेऊन फिरतो, असे सांगितले. तिच बंदूक सचिनने पाहण्यासाठी घेतली आणि चेष्टा मस्करीत भिंतीवर गोळी झाडली. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विनोदसह सचिनला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान सचिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.