महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी
राज्यात सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये कुरबुरींना जोर चढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. महायुतीमध्ये सामील झालेले आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या तिघांनी मिळून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली होती. दरम्यान बच्चू कडू यांच्यापाठोपाठ आणखी एका घटक पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाराज होते. परभणीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षासोबत त्यांची बोलणीही झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीने त्यांची समजूत काढली आणि त्यांना परभणीतूनच उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाली खरी, मात्र जानकरांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना जानकर यांनी पुन्हा एकदा नाराजीचे अस्त्र उपसले आहे.
जानकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना म्हटले की, रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचे? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे. आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हेच माहिती नसल्याने प्रत्येकाने आपली तयारी केली पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार आहे.