क्राईम
गणेशोत्सवाला गालबोट, विसर्जनावेळी दगडफेक
- कर्नाटकातील मंड्यामध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी जातीय हिंसाचार झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की, दगडफेक करून बदमाशांनी अनेक दुकाने आणि कपड्यांची तसेच बाईक शोरूमला आग लावली. एवढेच नाही तर बेकायदा जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या बाईकही जाळल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
वास्तविक, बदरीकोप्पलू गावातील तरुण गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढत होते. ही मिरवणूक नागमंगला मुख्य मार्गावरील मशिदीजवळून गेली. यादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती चिघळली आणि दोन समुदायांमध्ये हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर संतप्त हिंदू समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत जबाबदारांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आज नागमंगला बंदची हाक दिली आहे.
या घटनेनंतर मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांनी सांगितले की, गणेश मिरवणूक मशिदीजवळ पोहोचल्यावर तिथून मिरवणूक निघायला थोडा वेळ लागला. त्यावरून दोन्ही समाजात वादावादी सुरू झाली. - जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यासमोर जाऊन निदर्शने केली. इतर समाजातील लोकही मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यांनी काही दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला असलेली दुकानेही पेटवून दिली. परंतु परिस्थिती आता नियंत्रणात आहे.