ईव्हीएमबद्दलची शंका घालवायची असेल तर…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावकऱ्यांबरोबर संवाद साधला. तुमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे त्या शंकांचे निरसन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा विषय लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे देशाच्या लक्षात आले नाही ते गावकऱ्यांच्या लक्षात आले, असेही पवार म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना, मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावे. या गावकऱ्यांचे म्हणणे ऐकावे. त्यात काही तथ्य असेल तर त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला. हे करणे योग्य नाही. मी काय चुकीचे केले? तुमच्या गावी येणे चुकीचे आहे का? तुमचे म्हणणे ऐकणे चुकीचे आहे का? तुमच्या मनात शंका आहे. त्याची निरसन करणे हे चुकीचे आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. लोकांचे अधिकार काय आहेत. लोकशाही कशासाठी आहे. असे प्रश्न त्यांनी केले. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो इथे राजकारण करायचे नाही. लोकांच्या मनातली शंकेचे निरसन करायचे आहे. निवडणूक यंत्रणेबाबतचा संशय निर्माण होत आहे. यात राजकारण यायला नको. त्यांनी मला सल्ला दिला. मी त्यांना सांगतो, त्यांनी स्वत: या गावात यायला पाहिजे. लोकांचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यात तथ्य असेल तर निर्णय घेतला पाहिजे, असे आव्हानच फडणवीसांना दिले.
तुम्ही उठवलेला आवाज दिल्लीपर्यंत ऐकू गेला आहे. तुमचा प्रश्न मी स्वत: राज्यसभेत मांडणार आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण तालुक्यात, सर्व गावात ठराव करा. ईव्हीएममध्ये मतदान नको. पहिल्यासारखे मतदान द्या. त्याची माहिती आम्हाला द्या. ती आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू, असेही पवार म्हणाले.