शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण: आरोपी जयदीप आपटे सापडला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयदीपला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. याप्रकरणी महत्त्वाची बाब म्हणजे, जयदीप यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
जयदीपला अटक करण्यासाठी अनेक पथके नेमण्यात आली होती. त्यातील कल्याणमधील पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमने रात्री जयदीपला घरातून ताब्यात घेतले. सिंधुदुर्गचे पोलीस जयदीपच्या मागावरच होते. गुंजाळ यांनी आरोपी जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपी जयदीप हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन पोहोचला होता. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. त्याच्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी तो निघाला होता. परंतु, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणालाही इमारतीमध्ये सोडत नव्हते.