छावा बघायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा तिकिट खिडकीवर धुमाकूळ घालत आहे. सोलापूर, मुंबई, पुण्यासह देशभरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. दरम्यान अट्टल गुन्हेगारांनाही हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पुणे पोलिसांनी गनिमी कावा करत सराईत आरोपींना हडपसर येथील चित्रपटगृहाच्या बाहेरच बेड्या ठोकल्या. हडपसरमधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले. मात्र, चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले. मकोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले.
धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) दोघेही रा. शिव कॉलनी, आदर्श नगर, दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका तसेच एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दिघी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवसापासून फरार होते. युनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसरमधील चित्रपटगृहात छावा चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे.



