क्राईम
बायकोच्या अंगावर फेकली चिठ्ठी

- राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारल्याने एका टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संकेत रामचंद्र गावडे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना महाळुंगे येथील साई अमृत लॉज येथे घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दीपक मधुकर जाधव (वय-25, दिघी), दीपक सुभाष सोनवणे (वय-26, रा. महाळुंगे), तेजस सोपान गाढवे (वय-26), सचिन बालाजी चांदुरे (वय-33), अक्षय मारुती पाटील (वय-27, रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह त्यांचे साथीदार बंटी व गोल्या या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती संकेत हे मुलांसह जेवण्याकरिता जयदीप हॉटेल येथे गेले होते. यावेळी फिर्यादी यांचे पती बिल भरत असताना फिर्यादी या त्यांच्या मुलासह हॉटेलच्या बाहेर थांबल्या होत्या. यावेळी दीपक आणि त्याचा मित्र हे बाईकवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या अंगावर चिठ्ठी फेकली.
याचाच जाब फिर्यादी यांच्या पतीने विचारला असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी फोन करून साई लॉज येथे भेटण्यास बोलावले. फिर्यादीचे पती साई लॉज येथे गेले असता आरोपींनी संगनमत करून त्यांना दांडक्याने व लाथा बुक्क्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. फिर्यादी या पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संकेत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.