क्राईम
राज्यात रक्तरंजित थरार!

- सध्या संपूर्ण राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पुण्यात मागील काही दिवस झाले गुन्हे वाढताना दिसत आहेत. अशातच आता पुण्यातून एक खूनाची घटना समोर आली आहे. सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर एका सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यानंतर किरकोळ वाद झाला आणि त्या वादातूनच मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक घटना घडली. हनुमंत उर्फ गोट्या शेजवाळ असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीसांनी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी याला अटक केली आहे.
सिंहगड रोडवरील वडगाव ब्रिज परिसरात क्लासिक बार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काल रात्री गोट्या दारू पिण्यासाठी बसला होता. यावेळी आरोपी आकाश हा देखील त्या ठिकाणी होता. हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर आरोपी आकाश हा हॉटेलमधून बाहेर पडला. त्यावेळी गोट्या याने आकाश याचा पाठलाग सुरू केला.
आकाशला गोट्या त्रास देऊ लागला. त्यानंतर हे दोघेही सिंहगड रस्ता परिसरातीलच सुवर्ण हॉटेल जवळ पोहोचले. या ठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. - पुन्हा गोट्या आकाशला त्रास देऊ लागला. त्यानंतर संतापलेल्या आकाशने रस्त्याच्या जवळच असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानातील हातोडा घेतला आणि गोट्याच्या डोक्यात घातला. गोट्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपी आकाश याला ताब्यात घेण्यात आले आहे.