क्राईम

राज्यात मध्यरात्री रक्तरंजित थरार

  1. राज्यात काल मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये अजितदादा पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यासह त्यांच्या भावावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले आहेत. यात दोन्ही भावांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे. दुहेरी हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
  2. उमेश जाधव आणि प्रशांत जाधव असे हत्या झालेल्या दोन भावांची नावे आहेत. दोघेही काल रात्री साडे अकरा वाजता उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या आंबेडकरवाडीतील एका सार्वजानिक शौचालयासमोरून जात होते. यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही भावांवर अचानक हल्ला केला. अचानक हल्ला केल्याने दोन्ही भावांना स्वत:चा बचाव करता आला नाही.
  3. हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने दोघांवर अनेक वार केले. दोघांना भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पाडले. अशा प्रकारे हल्ला झाल्याची माहिती परिसरातील काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित युवकांनी दोन्ही भावांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.
  4. मयतांपैकी उमेश जाधव हे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आहे. दोन्ही भावांवर नेमका हल्ला कुणी केला आणि कशासाठी केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.

Related Articles

Back to top button