रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पंत अन् लोक पैसे घेऊन पळाले

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जानेवारीत होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पुढील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पंतची निवड झाली नाही. यानंतर पंत दिल्लीहून आपल्या गावी जात होता. यादरम्यान पंतच्या कारचा अपघात झाला.आता ऋषभच्या अपघातानंतर आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ऋषभच्या अपघातानंतर त्याच्या जवळील पैशांवर काही युवकांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी पंतची मर्सिडीज कार आज पहाटे नारसन बॉर्डरवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने वाटसरूंनी विंडो स्क्रीन तोडून पंतला गाडीतून बाहेर काढले. कारमध्ये त्यावेळी तो एकटाच होता.
अपघात घडल्यानंतर पंत कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तिथे काही युवक पोहोचले. त्या युवकांनी पंतला कारमधून बाहेर पडण्यास मदत करण्याऐवजी त्याच्या बॅगेतील पैशांवर डल्ला मारला आणि तिथून धुम ठोकली. विशेष म्हणजे, या युवकांनीच नंतर पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.



