क्राईम

अवघ्या चारच महिन्यांपूर्वी लग्न, पतीचा चारित्र्यावर संशय

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात काल ही घटना घडली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चारच महिन्यांपूर्वी प्रतीक्षाचा विवाह प्रीतम गरवारे या तरुणासोबत झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. चारित्र्यावर संशय घेऊन प्रीतम आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार प्रतीक्षाने तिच्या आई-वडिलांकडे केली होती. तसेच माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा पतीकडून तगादा लावला जात असल्याचा आरोप प्रतीक्षाने केला होता. दोघांमधील वादात कुटुंबियांनी मध्यस्थीसुद्धा केली होती. तरी त्याचा उपयोग झाला नाही.

दरम्यान, काल प्रतीक्षा आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या वादानंतर तिचा पती बाहेर निघून गेला. यानंतर प्रतीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. यात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी प्रतीक्षाने पतीला फोन करून घरी बोलावले. मात्र, तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button