महाराष्ट्र

मविआला बेचिराख करण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन राऊतांनी फोडला

  1. सध्या राजकारणात पडद्याआडून महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अर्थनीतीमुळे लोकप्रिय असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला भाजपाविरोधात सशक्तपणे लढणाऱ्या महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  2. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीला बेचिराख करण्याचा भाजपचा मास्टर प्लॅनच फोडून टाकला आहे. राज्यात महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावरून राऊत यांनी भाजपला घेरले आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजितदादा पवार यांच्यापुढे काय प्रलोभन ठेवले त्यासंदर्भातील गौप्यस्फोटही राऊत यांनी केले आहेत.
  3. शरद पवार यांच्या गटातील खासदार अजितदादा यांच्या गटात जाऊ शकतात का? यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार भाजप विचारासोबत जातील, असे मला वाटत नाही. मात्र, भाजपने प्रफुल पटेल, अजितदादा यांना सांगितले आहे की, पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील. त्यानंतर तुम्हाला मंत्रिपद देऊ, अशी ऑफर अजितदादांना भाजपकडून देण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. मी शरद पवार यांना ओळखतो. जवळजवळ मी रोजच असतो त्यांच्यासोबत. संसदेत राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे. धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नाही.
  4. सुरू असलेल्या सर्व घडामोडींमध्ये उद्योगपती गौतम अदानी यात मध्यस्थी करत आहेत. त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होत असून, महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्याचे भवितव्य घडवण्यासाठी अदानी काय दादा धर्माधिकारी, विनोबा भावे किंवा यशवंतराव चव्हाण आहेत का ? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. 

Related Articles

Back to top button