सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूरमध्ये शरद पवारांचा ताफा अडवला

संपूर्ण राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सोलापूरमध्ये आज मराठा बांधवांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. पवार हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज पवार हे सोलापूर दौऱ्यावर असून बार्शीतील शरद शेतकरी संवाद मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत.

या कार्यक्रमाला जाताना टेंभुर्णी -कुर्डुवाडी रस्त्यावर मराठा बांधवांनी पवार यांच्या गाडीचा ताफा अडवून मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत आपली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवताच पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, असे आंदोलकांना सांगितले. 

Related Articles

Back to top button