सोलापूर
ठाकरेंच्या सोलापुरातील सभेमुळे काँग्रेसला बुस्टर डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल खरपूस समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला.
ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यास महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे. कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचा आकस आहे. एका सामान्य कुटूंबातून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर देश चालवायचा का अशी भावना भाजपच्या मनात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना वाटते की, मी एवढे प्रयत्न करतो. तरी जनता मला देव मानत नाही. मात्र जनता डॉ. बाबासाहेब यांना देव मानते. हे खरे मोदींचे दुखणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ठाकरे यांच्या या सभेमुळे काँग्रेसला बूस्टर डोस मिळाला असून प्रणिती शिंदे यांच्यासाठी आता चांगलीच वातावरण निर्मिती होत आहे.



