प्रणिती शिंदेंची ताकद आणखी वाढली

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार भगीरथ भालके यांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात लढणा-या प्रणिती यांचे पारडे जड झाले आहे.
प्रणिती या आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल कारणार आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिल्याने प्रणिती यांना मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील ताकद मिळणार आहे.