क्राईम
ट्रॅक्टर मजुरांसह थेट विहिरीत कोसळला

- महाराष्ट्रावर अपघातांचे सावट कायम असताना आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव परिसरातील कांचननगर येथे महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भुज गावातील महिला मजूर हळद काढण्यासाठी आलेगाव परिसरात ट्रॅक्टरने जात होत्या. मात्र पावसामुळे ट्रॅक्टर स्लीप होऊन चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.
- अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला विहिरीत अडकलेल्या आहेत. या विहिरीत पाणी असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. यापैकी दोन महिलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघातावेळी परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. या महिलांचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून होता. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



