ब्रेकिंग! जरांगेंमागे शरद पवार, टोपेंचा हात, पोलिसांवर दगडफेकही

मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर आरोप करण्यासाठी आता त्यांचेच मराठा सहकारी कार्यकर्ते समोर आले आहेत. जरागेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि राजेश टोपेंनीच हात दिला आहे, हे मी शंभर टक्के पुराव्यानिशी सांगतो, असा दावा जरागेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी केला आहे. तसेच अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्यासही जरांगेंनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जरांगे यांच्या तीन जुन्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर खळबळजनक आरोप केला आहे. या सहकाऱ्यांमधील एक बाबुराव वाळेकर म्हणाले, मी जरांगेंचा जुना सहकारी आहे. मी त्यांच्यासोबत 18 वर्षापासून काम केले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तरूणांचा कसा वापर करायचा याचा जरांगेंना चांगला अभ्यास आहे, असे वाळेकर म्हणाले.
मी शंभर टक्के पुराव्यानिशी सांगतो, जरांगेंना शरद पवार आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे. तुम्ही त्याशिवाय इथे पोहोचू शकत नाही. तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि वापर करून घेता, असा आरोप वाळेकर यांनी जरांगेंवर केला आहे.