फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आली. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार इतके मात्र सध्या निश्चित दिसत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, देवेद्र फडणवीस आणि अजितदादा पवार उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याची तपशीलवार माहिती अजून समोर आलेली नाही. मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
या बैठकीचे फोटो बाहेर आल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे आता स्पष्ट झाले आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव तरी हीच गोष्ट सांगत होते. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची देहबोली सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. या फोटोत फडणवीस अमित शहा यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. शेजारीच शिंदे उभे आहेत. यावेळी फडणवीस आणि शहा दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. शिंदे मात्र गंभीर मुद्रेत दिसत आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदास भाव स्पष्ट दिसत आहेत. आणखी एका फोटोत अजितदादा पुष्पगुच्छ देऊन शहा यांचा सत्कार करताना दिसत आहेत. या फोटोतही शिंदे, फडणवीस, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आहेत. सर्वच नेते हसताना आणि आनंदी भावात दिसत आहेत.
मात्र या फोटोतही शिंदेंच्या चेहऱ्यावरील भाव गंभीर दिसत आहेत. याही फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.