ब्रेकिंग! सोलापूरकरांसाठी सकारात्मक बातमी
सोलापूर शहर व परिसरातील बेघर, गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सजग युवकांनी पुढाकार घेतला असून यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व बेघर नागरिकांच्या जीवनात आनंदाचा दिवा लावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलांना दिवाळीचा आनंद लुटता यावा, या हेतूने रद्दीतून सिध्दी ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती तुषार अवताडे, बसवराज जमखंडी, शैलेश अहिवळे, उषा बामणे यांनी दिली.
अवघ्या काही दिवसांपासून दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. यानिमित्त सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीला वेग आला आहे. विविध वस्तू व साहित्यांमुळे बाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. एकूणच शहरात दिवाळीनिमित्त चैतन्याचे वातावरण आहे. मात्र, समाजातील वंचित घटकाला या सणाचा आनंद लुटता येत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक कुटुंबीय या सणाच्या आनंदापासून वंचित राहतात. त्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी काही युवकांनी पुढाकार घेतला आहे. रद्दीतून सिध्दी हा उपक्रम राबवून त्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. शहरातील नागरिक आपल्या घरातील रद्दी किंवा वापरात नसलेले वस्तू किंवा साहित्य या उपक्रमासाठी देऊ शकतात. यातून आर्थिक मदत करून गरिबांना दिलासा देणार असल्याचे अवताडे यांनी सांगितले. रद्दी किंवा अन्य वस्तू जमा करण्यासाठी अवताडे (8600142594), उषा बामणे (9902436113) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.