राजकीय
शरद पवारांचे एक घाव दोन तुकडे

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नसून, अजित पवार आमचेच नेते असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. या विधानाने उलट-सुलट चर्चा रंगली असतानाच, पवारांनी खुलासा करत अजित पवार आमचे नेते, असे मी म्हटले नसल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी पक्षात कुठलीही फूट नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत. याला फूट कशी म्हणता येईल. जर पक्षातील एक मोठा गट वेगळा झाला तर, पक्षात फूट पडते. देशपातळीवर अशी स्थिती राष्ट्रवादीत नाही, असे विधान पवार यांनी आज बारामतीत केले होते.
पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर पवार यांनी ‘मी असे बोललोच नसल्याचे’ सांगत त्या वक्तव्यावर घुमजाव केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसून त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत अजितदादा पवार यांना पुन्हा संधी नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.



