महाराष्ट्र
देवदर्शनाला जाताना नवी कोरी गाडी उलटली, तीसहून अधिक भाविक…

अलीकडे राज्यातील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आज नाशिक परिसरात मोठा अपघात घडला आहे. नवी कोरी गाडी उलटून तीसहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे देवदर्शनाला जाताना ही दुर्घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील बंडू गांगुर्डे यांनी नवी पिकअप गाडी विकत घेतली होती. नव्या गाडीत ते 30 भाविकांसह सप्तशृंगी गडावर दर्शनाला जात होते.
देवीचे मंदिर फक्त एक किलोमीटर अंतरावर असताना संबंधित चालकाचे या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या अपघातात 30 भाविक जखमी झाले आहेत. चढ संपून गाडी उतारावर आल्यावर ही दुर्घटना घडली. या अपघातातील भाविकांचा आक्रोश ऐकून गडावरील नागरिक व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.