क्राईम
विहिरीत उडी टाकताच गर्भवती महिलेची पाण्यात प्रसूती

दोन मुलांचा मृत्यू झाल्याने तणावात असलेल्या गर्भवती महिलेने तणावामुळे विहिरीत उडी मारल्यामुळे तिच्यासह नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निकिता ठोंबरे असे मृत महिलेचे नाव असून ती नऊ महिन्यांची गर्भवती होती.
विहिरीत उडी मारल्यानंतर तिने पाण्यातच बाळाला जन्म दिला. त्यात आईसह नवजात बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या ह्रदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सुमठाना गावात राहणाऱ्या निकिताने यापूर्वी दोन बाळांना जन्म दिला होता. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर निकिता तणावात होती. दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या बाळाचे काय होणार? ही चिंता निकिताला गेल्या अनेक दिवसांपासून सतावत होती. याशिवाय गावातील नातेवाईक आणि इतर महिला तिच्याशी तिसऱ्या बाळाबाबत चर्चा करत असल्याने तिला आणखी टेन्शन यायचे.
त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नऊ महिन्यांची गर्भवती असताना निकिताने घरच्यांना न सांगता शिवारातील एका विहिरीत उडी मारली. त्यानंतर ती पाण्यात बुडत असताना तिची प्रसूती झाली. परंतु खोल पाण्यात बुडाल्याने निकितासह तिच्या नवजात बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.



