महाराष्ट्र

पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठा गोंधळ

दोनच दिवसापूर्वी दौंडहून सुटलेल्या काकीनाडा एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांनी सुमारे एक तासभर गोंधळ घातल्याची घटना काल रात्री घडली आहे.
मुंबई-बिदर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी गर्दीमुळे डब्याचे दरवाजे बंद केले होते. ही गाडी जेव्हा पुणे स्थानकात आली तेव्हा दरवाजे बंद असल्याने प्रवाशांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. 
काही प्रवाशांनी तर रेल्वेसमोर अक्षरशः झोपून आंदोलन केले. लातूरमध्ये आज 351 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी लातूरकडे येण्यासाठी उत्सुक होते. मात्र, गाडीत जागा नसल्याने आतील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी घोषणाबाजी करून आंदोलन केले. 
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या प्रवाशांची समजूत घातली. शेवटी सर्व परिस्थिती हाताळत रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या बोगीची दारे उघडली आणि हा प्रश्न निकाली लागला.
मात्र, या सर्व प्रकारामुळे या रेल्वेला लातूर स्थानकावर येण्यास दोन तास उशीर झाला. सकाळी 6 वाजता येणारी ही एक्स्प्रेस गाडी आठ वाजता लातुरात दाखल झाली. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Related Articles

Back to top button