महाराष्ट्र
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ

- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीत मिळालेला पराभव महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, पटोले यांनी असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता पटोले यांनी स्वत:च खरगे यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती आली आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली आहेत. आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नव्या कमिटीची स्थापना करावी. तसेच मला पदावरून मुक्त करा, अशा आशयाचे पत्र पटोले यांनी लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे पटोले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.