महाराष्ट्र

विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला

  • महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच काल खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना तगडा फटका बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातूम झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजितदादा पवार गिरीश महाजनांना उद्देशून म्हणाले होते कीm गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास, अशी टोलेबाजी केली होती. ती आता खरी ठरल्याचे दिसत आहे.
    या खातेवाटपाचे वैशिष्ट्य म्हटले तर ज्यांना मंत्रि‍पदाचा फारसा अनुभव नाही, अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्‍यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे.
    यामध्ये भाजप नेत्या पंकजा यांना धक्का बसल्याचे दिसत आहे. २०१४ मधील युती सरकारच्या काळात पंकजा महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. परंतु, नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खाते अदिती तटकरे यांना मिळाले होते. पुढील महायुती सरकारच्या काळातही तटकरे यांच्याकडेच हे खाते होते. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये अदिती यांनाच पुन्हा हे खाते मिळाले. तर दुसरीकडे पंकजा यांना मात्र पशुसंवर्धन खाते मिळाले आहे.
    शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल खात्याचे मंत्री होते. अर्थ खात्यानंतरचे महत्वाचे खाते म्हणून महसूलकडे पाहिले जाते. यंदाही हे खाते विखे पाटील यांनाच मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती महसूलच्या चाव्या दिल्या. तर विखे पाटील यांनी जलसंपदा खाते देण्यात आले तेही विभागून.
    भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही या खातेवाटपात धक्का बसला आहे. शिंदे सरकारच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन अशी दोन मोठी खाती होती. आता ही दोन्ही खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. याऐवजी त्यांना जलसंपदा खाते मिळाले आहे. पण यातही फक्त विदर्भ आणि तापी खोऱ्याचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे.

Related Articles

Back to top button