…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रच बंद होईल

पुण्यातील बंदचे पडसाद जर महाराष्ट्रात पसरत गेले तर, हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य केले. पुण्यातील बंदची केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी, असे त्यांनी आवाहन केले.
पुण्यात आज बंद आहे. पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असून, शिवाजी महाराजांचे संपूर्ण कार्य हे पुणे आणि रायगडातून पुढे गेलं. पुण्यात आज कडकडीत बंद सुरू आहे. या बंदची दखल केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी. तुम्ही लिहिलेल्या पत्राचा परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही हे पुणेकर दाखवून देत आहेत. या पुण्यातील बंदचे पडसाद जर संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले तर, हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल, असा इशारा राऊत यांनी दिला.



