ब्रेकिंग! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी रवींद्र धंगेकरांनी फोडली

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. धंगेकरांनी एक्सवर पोस्ट शेअर करून काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, ट्वीट व्हायरल होताच धंगेकरांनी उमेदवारांच्या यादीची पोस्ट डिलीट केली.
धंगेकरांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख (लातूर), यशोमती ठाकूर (तेओसा), ऋतुराज पाटील (दक्षिण कोल्हापूर), बाबा मिस्त्री (मध्य सोलापूर शहर), धर्मराज काडादी (दक्षिण सोलापूर), तर रवींद्र धंगेकर कसबा पेठेतून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. दरम्यान याबाबत आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे यादी जाहीर करू, असे महाराष्ट्र काँग्रेसने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.