सोलापुरात ‘महिला आयोग आपल्या दारी’ ; रुपाली चाकणकर राहणार उपस्थित
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मंगळवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन, शासकीय दुध डेअरी जवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे, आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न असून, या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे हे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोगाद्वारे करण्यात येत आहे.