महाराष्ट्र
सुप्रिया सुळेंनी केले शिंदे गटातील आमदाराचे कौतुक

शिंदे गटातील आमदार हे सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत होते. राष्ट्रवादीचे नेते शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप सुद्धा शिंदे गटाकडून राष्ट्रवादीवर करण्यात येत होता. अशातच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
यावरून मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला होता. सुळे यांच्या समर्थकांनी सत्तार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पण हे सगळे सुरु असतानाच आता मात्र या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. सुळे यांनी शिंदे गटातील आमदारांचे कौतुक केले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.
त्यामुळे कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका होत आहे. अशातच शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा कोश्यारी आणि त्रिवेदी यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर चांगले नाही. अशाने पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागेल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले, त्या विरोधात गायकवाड यांनी जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही, असे ट्विट करत सुळे यांनी गायकवाड यांचे कौतुक केले आहे.