सोलापूर जिल्ह्यात पावसाचे तांडव

Admin
2 Min Read
  • सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या अनेक गावांमधील नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन तालुकास्तरीय यंत्रणाच्या सहकार्यातून प्रयत्नशील आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
  • जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले, महावितरणचे अधिक्षक अभियंता एस.एम. माने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अति. आयुक्त सो.म.पा. संदीप कारंजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता सा.बां.जि.प. नरेंद्र खराडे यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
  • जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामपंचायत, महसूल व महावितरण विभागातील प्रत्येकी दोन कर्मचारी 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये कार्यरत राहतील, असे त्यांनी आदेशित केले. तसेच कोणीही मुख्यालय सोडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
  • तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी ठेकेदारांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करावे, आरोग्य विभागाने औषधांचा पुरवठा करून डॉक्टर, सिस्टर, आशा वर्कर व सफाई कर्मचारी नेमावेत, ग्रामपंचायत विभागाने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महावितरण विभागाने 24 तास लाईनमन नियुक्त करावा, इरिगेशन विभागाने संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी सादर करावी, तर ग्रामीण पोलीस विभागाने दक्ष राहून इतर विभागांशी समन्वय साधावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Share This Article