चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राज्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विनोद विजय जाधव (वय 26) असे पतीचे नाव आहे. तर पिंकी विनोद जाधव (वय 21) असे त्याच्या बायकोचे नाव आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या कटगुण गावातील गोसावी वस्तीवर ही घटना घडली आहे.
विनोदने पिंकीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून तिची हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर आरोपी पती स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना सांगितले की, मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने तिची हत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घरात पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. नातेवाईकांच्या मदतीने तिला तात्काळ पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.