सोलापूर ते मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होण्यासाठी प्रयत्न करा

Admin
3 Min Read
  • सोलापूर :- कायद्याच्या कक्षेत बसून सर्वसामान्य वाहनचालकांना चेक पोस्टवर विनाकारण त्रास दिला जात आहे. तसेच या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे. त्या अनुषंगाने आंतरराज्य सीमावर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
  • शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा, सहव्यवस्थापक अंजनी शर्मा, माजी राज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अमोल शिंदे, रमेश बारसकर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
  • परिवहन मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी येथील चेक पोस्टला आपण स्वतः भेट दिलेली असून त्या चेक पोस्ट वरून रोज किती गाड्या पास होतात तसेच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यावर कारवाई केली याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
  • सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. तसेच अतिवृष्टीने सोलापूर शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले होते त्याचेही पंचनामे करावेत व असे नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.
  • विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने सोलापूर येथून मुंबईसाठी विमान सेवा लवकरच सुरू होईल या दृष्टीने संबंधित विमान कंपनीकडे पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन जिल्हा प्रशासनाने करावे, असेही त्यांनी सांगितले.
  • कामगार विभागाच्या वतीने सर्वसामान्य व गोरगरीब कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो परंतु या विभागाकडे बऱ्याच तक्रारी येत असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः या दृष्टीने स्वतंत्र बैठक घेऊन विना तक्रार जिल्ह्यातील सर्व कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच मंद्रूप, दुधनी व बोरामणी येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक होण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता महसूल प्रशासनाकडून व्हावी. एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी उपरोक्त ठिकाणी भेटी देऊन जागा पाहणी करावी व सदरची जागा महसूल प्रशासनाकडून मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप एमआयडीसी येथील नवीन जागी लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.
  • प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच पंचनामे कार्यवाही पूर्ण होत असून त्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विषय सूचीनुसार विषयांची माहिती दिली.
Share This Article