ब्रेकिंग! चौदा पाकिस्तानी दहशतवादी घुसले, उद्या मुंबईवर मोठ्या हल्ल्याचा कट?

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘ह्युमन बॉम्ब’ स्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या मेसेजमध्ये, ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या एका दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्याने दावा केला आहे की, 34 वाहनांमध्ये ‘ह्युमन बॉम्ब’ लावण्यात आले आहेत आणि त्यांच्या स्फोटानंतर संपूर्ण मुंबई शहर हादरून जाईल.
धमकीच्या मेसेजमध्ये आणखी काही गंभीर दावे करण्यात आले आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, चौदा पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. तसेच चारशे किलो आरडीएक्सच्या स्फोटात सुमारे एक कोटी लोकांचा जीव जाईल, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे.
अनंत चतुर्दशीच्या काळात शहरात मोठी गर्दी असते, त्यामुळे अशावेळी आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही जोखीम न घेता तातडीने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस या मेसेजची गंभीरता तपासत आहेत आणि शहराच्या प्रमुख ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.



