मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत.
त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.
आमचे सरकार सोबतचे वैर संपले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनी येथे येऊन आमचे उपोषण सोडवावे, असे जरांगे म्हणाले. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना प्रथम उपोषण सोडण्याची विनंती केली. हे तिघेही बाहेर असल्यामुळे ते येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.