मुंबईतील आझाद मैदानात आज दुपारी राज्य सरकारच्या उपसमितीच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची तातडीने भेट घेतली. समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जरांगे यांच्याबरोबर चर्चा केली. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना जरांगे यांनी मोठी घोषणा केली.
जरांगे म्हणाले, आपल्या मागण्या सरकारकडे लेखी सादर केल्या होत्या. हैदराबाद गॅझेट मान्य झाल्यास सरकार तात्काळ अध्यादेश काढणार आहे. राज्य सरकारचे निवेदन आपल्या अभ्यासाकांकडे पाठवले जाईल. सातारा गॅझेटलाही मान्यता देण्याची तयारी सरकारची आहे. यासाठी एक महिन्यात सातारा गॅझेट सरकारने लागू केले पाहिजे. या गॅझेटियरबाबत निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. या गॅझेटिअरबाबत मान्यता देणास उपसमिती तयार केली जाईल. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील.
जरांगेंच्या आंदोलनाला मुंबईत मोठा विजय मिळाला असून हैदराबाद गॅझेट सरकारने मान्य केले आहे. तासाभरात यासंदर्भातील जीआर सरकार काढणार असून तो हाती आल्यानंतर गुलाल उधळत जरांगे मुंबई खाली करणार आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर तत्काळ काढला तर रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करणार, असे जरांगे म्हणाले. जीआर लवकरच काढणार असल्याचा शब्द मराठा उपसमितीने जरांगेंना दिला आहे. जरांगेंनी सरकारचा अंतिम मसुदा मान्य केल्यानंतर आझाद मैदानात एकच जल्लोष झाला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.