क्राईम
36 लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीला मुलांसमोरच जिवंत जाळले

- हुंड्यासाठी एका विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निक्की नामक महिलेला हुंड्याच्या मागणीसाठी मारहाण करून नंतर जाळून मारण्यात आले. निक्कीचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विपिनसोबत झाला होता. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जाळण्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्यावरील क्रूरता स्पष्टपणे दिसते. या घटनेनंतर निक्कीच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो “पप्पांनी आईला लायटरने जाळले” असे म्हणताना दिसत आहे.
- उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सिरसा गावातील निक्कीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नात स्कॉर्पिओ गाडी आणि इतर अनेक वस्तू दिल्या असूनही सासरच्या लोकांची 36 लाख रुपयांची मागणी सुरूच होती. निक्कीची बहीण कंचन हिने सांगितले की, 21 ऑगस्ट रोजी निक्कीचा पती विपिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली.त्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सुरुवातीला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पण वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.
- या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. कासना पोलीस ठाण्यात मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीवरून पती विपिन, दीर रोहित, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विपिनला अटक केल्यानंतर मेडिकल चाचणीसाठी नेताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्याच्या पायाला गोळी लागली. दरम्यान त्याला पुन्हा ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



