शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे भाऊ आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि नियुक्त्यांमधील नाराजीमुळे अखेर त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
माढा तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शहरप्रमुखांच्या नियुक्त्या सावंत यांच्याशी चर्चा न करता झाल्यामुळे ते असमाधानी होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षश्रेष्ठींकडून साधी विचारपूस न झाल्याने त्यांनी हा निर्णय अधिक ठाम केला.
दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना सावंत यांनी त्यांची गुप्त भेट घेतली होती. या चर्चेनंतरच त्यांनी भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. पुढील दोन दिवसांत फडणवीसांच्या उपस्थितीत सावंत यांच्यासह माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवासेना व महिला आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होणार आहेत.