गुरुवारी झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या दुसर्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा दहा गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंवर टीका केली जात आहे. रोहित सेनेचे नेमके कुठे चुकले, यावरही बोट ठेवले जात आहे.
आता पाकिस्तानचे माजी खेळाडूदेखील टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठवत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमनेही रोहित सेनेवर कडव्या शब्दात टीका केली आहे. भारतातील आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय संघात जबरदस्त फरक पडेल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात भलतेच घडले.
विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकपचे एकही विजेतेपद जिंकता आले नाही. मग आयपीएल खेळून काय दिवे लावले, असा परखड सवाल अक्रमने उपस्थित केला आहे. दरम्यान, यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमधील फायनलाचा सामना 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.