क्राईम
रिअल इस्टेटचा व्यवसाय, स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी

- पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- विशेष म्हणजे, या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या हाऊस पार्टीतून खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या धाडीत दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे.
- ज्या रुममध्ये हा छापा टाकण्यात आला ते प्रांजल यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. प्रांजल हे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी रोहिणी खडसे यांनी विवाह केला. खेवलकर आणि खडसे कुटुंबीय मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. पत्नी रोहिणी या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत.
- प्रांजल रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे. प्रांजल हे यापूर्वी कारमुळेही चर्चेत आले होते. या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या कारची नोंदणी जळगाव आरटीओमध्ये झाली होती. मात्र, या कारची नोंदणी हलक्या वाहनांच्या श्रेणीत करण्यात आली होती.



