क्राईम
पोलिसानेच काढली अल्पवयीन मुलीची छेड

- राज्यात अल्पवयीन मुलाला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 12 वर्षांच्या मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार करणारा व्यक्ती पोलीस शिपाई आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. या प्रकरणी अंबरनाथ येथील आग्रीपाडा पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
- 12 वर्षांची मुलगी आग्रीपाडा परिसरात राहणारी असून, शनिवारी ती आपल्या इमारतीखाली प्रसाद आणण्यासाठी खाली आली होती. त्यावेळी संबंधित आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. जेव्हा मुलगी लिफ्टनेवर जाण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा आरोपीने तिला थांबवले आणि तिचा हात पकडला. त्यानंतर जबरदस्तीने तिला तळमजल्यावरून पायऱ्यांनी ओढत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार घरी जाऊन आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने तत्काळ आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत छेडछाडीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात 45 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून तो ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडिओ आरोपीविरोधात महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.



