क्राईम

नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या बाळाचा मृ्त्यू

  • नवरा बायकोच्या भांडणामध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये घडली आहे. अवधूत मेंगवडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेला.
  • बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती-पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
  • यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात. किरकोळ गोष्टीवरून त्यांचे त्यांची बायको पल्लवीसोबत भांडण सुरू झाले. त्यावेळी पल्लवीने नवरा नितीन याला मारण्यासाठी त्रिशूल उगारला. पण तो त्रिशूल बाजूला उभ्या असलेल्या भावजयीच्या कडेवर असणाऱ्या अकरा महिन्याच्या बाळाच्या (पुतण्या) डोक्यात घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या अवधूतला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत अवधूतचा मृत्यू झाला होता.
  • या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पल्लवी तिचा नवरा नितीन यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. कोणतीही चूक नसताना या अकरा महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत पोलिसांना वेगळाच संशय असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला आहे का? आरोपींनी रक्ताने माखलेले त्रिशूल आणि त्या ठिकाणचे रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला आहे. यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button