- कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्याजवळील प्रसिद्ध आई एकविरा देवी मंदिरात सात जुलैपासून ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. मंदिराच्या पावित्र्याची जपणूक राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांसह स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
- देवी संस्थानकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. संस्थानच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अंगप्रदर्शन करणारे किंवा तोकडे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या नियमाची अंमलबजावणी सात जुलैपासून काटेकोरपणे केली जाणार आहे. महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्व वयोगटांमधील भाविकांवर हा नियम लागू असेल.
- महिला आणि तरुणींनी मंदिरात प्रवेश करताना साडी, सलवार- कुर्ता, कुर्ती, दुपट्टा किंवा इतर पारंपरिक भारतीय पोशाख घालावा. परिधान केलेले कपडे संपूर्ण शरीर झाकणारे असावेत. मिनी स्कर्ट, शॉर्ट्स, फाटलेली जीन्स, वेस्टर्न ड्रेस यांना मंदिर परिसरात परवानगी नसेल.
- पुरुषांनी धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पॅन्ट-शर्ट किंवा टी-शर्टसारखे पारंपरिक किंवा सभ्य कपडे परिधान करावेत. अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावेत. हाफ पॅन्ट, वेस्ट, फाटलेली जीन्स किंवा अपमानकारक संदेश असलेले कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
ब्रेकिंग! एकविरा आईच्या मंदिरात पाळावा लागणार ड्रेस कोड
